नवी दिल्ली : उत्तराखंडच्या कॅबिनेट मंत्री रेखा आर्या यांनी त्यांचे पती गिरधारी लाल साहू यांच्याविरोधात गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल केली आहे. त्यांनी पतीवर घरगुती हिंसाचार, फसवणूक (पहिलं लग्न झाल्याचं लपवणं), अनैतिक संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये त्या रडताना दिसल्या आणि स्वतःच्या व मुलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे.
रेखा आर्या या अल्मोडा जिल्ह्यातील सोमेश्वर येथून भाजपाच्या आमदार असून उत्तराखंड सरकारमध्ये महिला व बाल कल्याण मंत्री आहेत. रेखा आर्या यांच्या तक्रारीनुसार, ६ जुलै २००४ रोजी गिरधारी लाल साहू यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. मंत्र्यांनी डेहरादूनच्या कॅन्ट पोलीस ठाण्यात पतीविरोधात एफआयआर नोंदवली आहे. विरोध केल्यास त्यांना मारहाण करण्यात आली आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप आहे.
रडत रडत मांडली आपली व्यथा
तक्रार दाखल केल्यानंतर रेखा आर्या यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्या रडत आपली व्यथा मांडताना दिसल्या. पतीने सरकारी निवास स्थानावर कर्मचार्यांसमोर त्यांच्याविरोधात अपमानास्पद आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असाही आरोप आहे. तसेच बनावट स्वाक्षर्या करून आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना कंपनीच्या संचालक पदावरून काढण्यात आल्याचं दाखवण्यात आलं.
ऑडिओच्या आधारावर हत्येचा कट रचल्याचा आरोप
एवढंच नाही तर त्यांनी एका ऑडिओचाही उल्लेख केला आहे. हा ऑडिओ नुकताच समोर आला असून, यामध्ये आरोपी एका महिलेशी बोलताना मंत्र्याला जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप आहे. यामुळे मंत्री मानसिक आणि शारीरिक तणावाखाली जीवन जगत आहेत. याच दरम्यान, त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
२०१४ पासून सोमेश्वर मतदारसंघातून आमदार
रेखा आर्या यांच्या तक्रारीवरून त्यांचे पती गिरधारी लाल साहू यांच्याविरोधात १५ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाची धमकी (ऑडिओच्या आधारावर), फसवणूक आणि छळ यांसारखी गंभीर कलमं लावली आहेत.
रेखा आर्या या सोमेश्वर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. त्यांनी २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र बराकोटी यांचा ५,२९३ मतांच्या फरकाने पराभव केला होता. रेखा आर्या यांना एकूण २६,१६१ मते मिळाली होती. यापूर्वी त्यांनी २०१७ च्या निवडणुकीतही राजेंद्र बराकोटी यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, २०१२ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु त्यानंतर २०१४ च्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.